बोरविहिरचे ताई-तात्या आणि भावडु मामा
आज बोरविहीर च्या ताईंचे ( आजी) निधन झाले आणि अनेक आठवणी तरळून आल्या.
वडिलांची १९८७ ला बोरविहीर ह्या गावी कारखान्यात नियुक्ती झाली.
गावात राहत असताना श्री. सीताराम तात्या आणि सौ. भूरा ताई ह्या प्रेमळ दापंत्याशी ओळख झाली. एक मुलगा (भावडू मामा) आणि चार मुली असलेल्या ताई तात्यांनी माझ्या आईला पाचवी मुलगीच मानले. आणि हा ऋणानुबंध आजही जपला जातोय.
लाकूड फोडत असलेल्या तात्यांना मदत म्हणून माझे वडील ( नाना) स्वतः हुन पुढे गेले. तात्यांना वाटलं हा नोकरदार माणूस काय लाकूड फोडेल. पण नाना शेतकरी कुटुंबातले तरुण , त्यांनी लगेच ते काम कोणतीही लाज न बाळगता पूर्ण केले. तात्यांनी लगेच ताईंजवळ सांगितले की , हा माणूस वेगळा आहे. ताई तात्यांशी तेंव्हापासून ओळख झाली.
पुढे अमित दादाचा ( माझा मोठा भाऊ ) जन्म झाला आणि त्याला ताई तात्यांच्या घरीच आजोळ लाभलं. लहानपणापासून दादाला त्यांचा आणि त्यांना दादाचा लळा लागला आणि एक घट्ट नातं तयार झालं. शेतातून बैलगाडी वर येणाऱ्या तात्यांची बराच पुढे जावून दादा वाट पाहत बसे. मग तात्या त्याला बैलगाडीतून घरी आणत. त्या बैलगाडीला तसचं सोडून अगोदर दादाला ओट्यावर उतरवणे आणि मग पुढे बैलगाडी सोडणे असा उपक्रम असायचा.
चुलीत छोटी छोटी लाकड लावणे ( चींग्या चिंग्या खेळणे ), हिरव्या मिरचीचा तिखट खुडा, कळण्याची भाकरी, शेतातून वेचून आणलेले बोर, चिंचा असा गावरान जेवणाचा बेत दादाला त्या घरीच खिळवून ठेवत असे.
पुढे जेंव्हा माझा जन्म झाला तेंव्हा आई गावी असताना जवळपास चार महिने ताईंनी नानांना मुलाप्रमाणे जेवण/डबा खावू घातले. त्या उपकारांची जाणीव नानांना आजही आहे.
आम्हा भावंडांचे ( अमित आणि बाळा) खूप लाड केले ताई तात्यांनी आणि भावडू मामांनी. बैलगाडी जुंपून शिरुड च्या यात्रेलाही नेले होते.
आम्ही पुढे धुळ्याला राहायला आलो, पण जेंव्हा जेंव्हा बोर विहीर ला गेलो तेंव्हा तेंव्हा तीच आपुलकी, तोच सन्मान , तेच प्रेम मिळत गेलं.
भावडू मामांनी, चित्रा मामींनी आणि ंत्याच्या सनी, रिंकू आणि प्रेम ह्या अपत्यांनी ही तो वारसा पुढे सुरू ठेवला. प्रत्येक रक्षाबंधन , दिवाळीला हे नात द्विगुणित होत गेलं.
आमच्या घरी झालेल्या प्रत्येक लग्न, मृत्यू आणि इतर प्रत्येक कार्यक्रमात, समारंभात भावडू मामा आणि मामी यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
जीवनात अनेक चढ उतार पाहीलेले तात्या आणि ताई, शेतकरी म्हणून दोघांनी खूप कष्ट केले पण शेवट पर्यंत प्रामाणिक राहिले. अनेक सुख दुःख यांनी सोबतच पाहिली. तात्या गेल्यानंतर ताई ही देवाला विनंती करत होत्या. देवाने ही नको म्हणता म्हणता भरपूर आयुष्य दिले, आणि अखेर या प्रेमळ, कष्टाळू अध्यायाची आज सांगता झाली.
देव अश्या पुण्यात्मा आजीला त्याच्या निजधामात प्रवेश देवो, हीच प्रार्थना 🙏🌺
Comments
Post a Comment