डोंगर खाणारे प्राणी


डोंगर खाणारे प्राणी

     टेकडी पासून पर्वतापर्यंत विविध आकारात या भूतलावर खंबीरपणे त्याचे अस्तित्व टिकून उभा असतो तो डोंगर! बहुतांश लोकांच्या आवडत्या देखाव्याच्या चित्रांमध्ये, सूर्याच्या आजूबाजूला व्ही (V) आकाराची दरी करणारे ते दोन डोंगर! भूमातेच्या स्तनांची उपमा असलेले हेच डोंगर जवळपास सर्वच नद्यांची उगमस्थान असतात! एकंदरीतच, विशाल, महाकाय, मजबूत अशी भौगोलिक ओळख असलेल्या डोंगराला कोण बरं खाईल? तो काय केकचा किंवा पनीरचा तुकडा थोडाचं आहे!

    उंदीर, ससे, घुशी इत्यादी जमिनीत घर करून राहणारे प्राणी हे कदाचित पोखरून काढतील, पण त्यांच्या गरजेपुरतच. त्यामुळे सर्व डोंगर त्यांच्यामुळे खाल्ला जातो आहे, यात शंका आहे!

    मग कोण बरं खात असेल डोंगराला?

    उत्तर तुम्हालाही ठाऊक आहे; पृथ्वीच्या कुशीत निपजलेला तिचा सर्वात हुशार पुत्र, मनुष्य!

    मैदानावरची माती कमी पडली, म्हणून नदी उपसली, नदी कमी पडली, म्हणून मग आता डोंगर पोखरायला सुरुवात झाली. कधी रस्ते बांधायला दगड हवेत, तर कधी खनिजाची गरज असते, कधी डोंगराच्या आतून रस्ता करायचा असतो, तर कधी पाईपलाईन टाकायची असते. कारणं अनेक आहेत, पण फडशा पडतो तो बिचारा डोंगराचा! यात अवैध तस्करी करणारे, त्या दगड मातीचा व्यवसाय करणारे, मोठमोठाली जेसीबी यंत्र आणि ट्रक घुसवून अक्षरशः डोंगर पोखरून काढणारे आणि या सर्वांकडे कानाडोळा करून एकप्रकारे मूकसंमती देणारी सरकारी मंडळी हे सर्वच डोंगर खाणारे प्राणी!

    आपल्या घरातील दगड माती कोणी अशी चोरून नेली तर आपण गप्प बसू का ? मग आपल्या वाड वडीलांपासून किंबहुना त्यांच्याही अगोदर पासून आपल्या पर्यावरणाचे, आपल्या सीमांचे , आपल्या अस्मितेचे हे संरक्षक बुरुज पोखरणाऱ्या ह्या स्वार्थी उंदरांना आपण अटकाव नाही करू शकत ?

    कोणत्याही विकास कामाची सुरूवात, पर्यावरणीय हानीचे मूल्यमापन करून म्हणजेच पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (Environmental Impact Assessment ) करून केली जाणे आवश्यक असते. पण विकासाच्या नावाखाली आपण आपल्याच मातीला खावून जातोय, मग आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर आपण कोणता आदर्श ठेवतोय? विकास अवश्य व्हावा, मात्र तो शास्वत असावा!

    ह्या डोंगर खाणाऱ्या प्राण्यांना अटकाव करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक होवून , ह्यांच्या अश्या चोरीला उजेडात आणण्यासाठी हिंमतीने , एकजुटीने , वेळ पडल्यास कायद्याच्या मदतीने प्रतिकार करणे आवश्यक आहे. डोंगरांवर वृक्षारोपण करणे, जमिनीची धूप कमी होण्यासाठी लोक सहभागातून उपाय करणे.

    डोंगर दादाच्या रक्षणासाठी ह्या पर्यावरण दिनी आपण संकल्प करूया आणि जागरूक राहण्याची प्रतिज्ञा करूयात!


✒विशाल पाटील , धुळे.

Topic suggested by : Sandip Patil.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निधीचा गृहप्रवेश

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

स्वाती: चैतन्याचा झरा